CoronaVirus in Washim : आणखी २२ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४१३ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:10 IST2020-07-22T17:09:50+5:302020-07-22T17:10:01+5:30
जिल्ह्यात दिवसभरात एकूण २२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता कोरोनाबाधितांची संख्या ४१३ झाली आहे

CoronaVirus in Washim : आणखी २२ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४१३ !
वाशिम : जिल्ह्यात दिवसभरात एकूण २२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आता कोरोनाबाधितांची संख्या ४१३ झाली आहे. दरम्यान, २१ जुलै रोजी १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये २१ जुलै रोजी २२ जणांची भर पडली. सोमवारी रात्री उशिरा ६४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. हा व्यक्ती साईलीला नगर, वाशिम येथील असून यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.
२१ जुलै रोजी दिवसभरात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये मांगवाडी (ता. रिसोड) येथील ११, मंगरूळपीर शहरातील माळीपुरा येथील १, कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व नगरपरिषद परिसरातील १, वाल्हई (ता. कारंजा लाड) येथील १, मालेगाव शहरातील भावसार गल्ली परिसरातील २ व गांधीनगर परिसरातील १, इराळा (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाशिम शहरातील गुप्ता ले-आऊट, हिंगोली नाका परिसरातील १ व्यक्ती अकोला येथे कोरोना बाधित आढळून आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात कोण, कोण आले, याची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आले.
१३ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मंगळवार, २१ जुलै रोजी उपचार घेणाºया १३ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने, रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथील ४, कसाबपुरा येथील १, हिवरा रोहिला येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १ व कामरगाव येथील ३ व्यक्तींचा समावेश आहे.