Corona in Washim : पॉझिटिव्हिटी रेट केवळ सात टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 12:36 IST2021-05-30T12:36:31+5:302021-05-30T12:36:38+5:30
Corona in Washim : गेल्या सात दिवसांत २८ हजार ४८० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात केवळ २०२४ कोरोनाबाधित आढळून आले.

Corona in Washim : पॉझिटिव्हिटी रेट केवळ सात टक्क्यांवर
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ नंतर जिल्ह्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ३२ हजार ३४४ नव्या रुग्णांची भर पडली. दरम्यान, संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लादलेले कडक निर्बंध आणि त्यास नागरिकांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे कोरोनाबाधितांचा आलेख हळूहळू खाली येत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या सात दिवसांत २८ हजार ४८० लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात केवळ २०२४ कोरोनाबाधित आढळून आले. पॉझिटिव्हिटी हा रेट केवळ सात टक्के आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्गाच्या संकटास सुरुवात झाली. तेव्हापासून १५ फेब्रुवारीपर्यंत संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र त्यानंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली.
गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात ३२ हजार ३४४ नव्या रुग्णांची भर पडून २८ मे २०२१ अखेर बाधितांचा आकडा ३९ हजार ६८३ वर पोहोचला. या काळात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या वाढून ४५१ झाली आहे. यामुळे जिल्हाभरात भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, जिल्ह्यावर ओढवलेल्या या संकटाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले. आरोग्य विभागानेही प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.
कोरोना विषाणू संसर्गासंबंधी २२ मे ते २८ मे या सात दिवसांचा विचार केल्यास कोरोनाचे संकट हळूहळू ओसरत चालल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. यादरम्यानच्या काळात आरोग्य विभागाने जिल्ह्यात एकूण २८ हजार ४८० लोकांच्या चाचण्या केल्या.
त्यात केवळ २०२४ नवे रुग्ण निष्पन्न झाले; तर २६ हजार ४५६ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्या तुलनेत सात दिवसांत ३३०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटीचा हा सरासरी रेट केवळ ७ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुग्णसंख्येत घट; पण टळले नाही संकट
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी ३०० पेक्षा अधिकच होती; मात्र गेल्या काही दिवसांत हा आकडा कमी झाला आहे. त्यातुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी संकट अद्याप पूर्णत: टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘ऑक्सीजन, व्हेंटीलेटर’वर केवळ १३८ रुग्ण
गेल्या काही दिवसांपुर्वी ‘ऑक्सीजन’ आणि ‘व्हेंटीलेटर’वर ठेवाव्या लागणाऱ्या कोरोना बाधितांचा आकडा ५०० पेक्षा अधिक झाला होता; मात्र आता हे प्रमाणही कमी झाले असून २९ मे अखेर ऑक्सीजनवर १२०; तर व्हेंटीलेटरवर केवळ १८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी दिली.
जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. मे महिन्यातही चढता आलेख कायम राहिला; मात्र अखेरच्या आठवड्यात रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. २२ ते २८ मे या कालावधीत करण्यात आलेल्या २८ हजार ४८० चाचण्यांपैकी केवळ २०२४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. ही बाब सर्वांनाच दिलासा देणारी ठरली आहे.
- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम