corona virus graf increase in Washim | कोरोना संसर्गात पुन्हा होतेय वाढ

कोरोना संसर्गात पुन्हा होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोना संसर्गाचे प्रमाण घटल्याने दिलासा वाटू लागला असतानाच जानेवारीत कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे दिसते. त्यातही जानेवारी महिन्यातील पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १ ते २३ जानेवारीपर्यंतच्या एकूण ३३७ बाधितांपैकी १४० जण १६ ते २३ जानेवारीदरम्यानच्या तिसºया आठवड्यातच आढळून आले आहेत. विशेष म्हणजे वातावरणात उष्णता वाढत असताना कोरोना संसर्गाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसत आहे. 
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. तथापि, पुढील तीन महिने कोरोना संसर्गाने फारसा वेग घेतला नाही; परंतु जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांदरम्यानच जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला. आॅक्टोबरच्या उत्तरार्धापासून मात्र कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला. थंडीच्या काळात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना याच कालावधित कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आता मात्र थंडीचे प्रमाण कमी होत असताना कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात जानेवारी महिन्यात २३ दिवसांत वाशिम जिल्ह्यात एकूण ३३७ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १४० लोकांना १६ ते २३ जानेवारी या आठ दिवसांतच कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 

Web Title: corona virus graf increase in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.