Corona vaccine was given to 300 frontline workers on the first day | पहिल्या दिवशी ३०० फ्रंटलाइन वर्कर्संना दिली कोरोना लस

पहिल्या दिवशी ३०० फ्रंटलाइन वर्कर्संना दिली कोरोना लस

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, पहिल्या दिवशी वाशिम, कारंजा व मंगरूळपीर अशा तीन केंद्रांत ३०० फ्रंट लाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंट लाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी १०० अशा एकूण ३०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या सर्वांना मोबाईलवर संदेश पाठवून लसीकरण मोहिमेला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.

लसीच्या पहिल्या मानकरी पूनम सराफ

कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली असून, पहिल्या दिवशी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी पूनम सराफ यांना लस देवून मोहिमेला सुरुवात झाली. लसीच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या सराफ यांच्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाशिम येथे एकूण ९९ जणांना लस देण्यात आली. एकूण ५८३८ जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

Web Title: Corona vaccine was given to 300 frontline workers on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.