Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:07 IST2021-05-17T12:07:06+5:302021-05-17T12:07:26+5:30
Corona Vaccination: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेत, विशेषत: ग्रामीण भागात हा गोरखधंदा सुरू आहे.

Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना लस घेण्याकरिता ‘कोविन ॲपद्वारे रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. असे असताना ‘रजिस्ट्रेशन’ न करताच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील शेकडो लोकांना लस दिली जात आहे. लसीकरण केंद्रांवर कार्यरत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेत, विशेषत: ग्रामीण भागात हा गोरखधंदा सुरू असून, शहरातील अनेकांनी लस घेण्यासाठी खेड्यांची वाट धरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लसींचे दोन डोस घेतल्यास कोरोनापासून बचाव शक्य असल्याबाबत जिल्हाभरात आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात आली आहे. लस घेतलेले बहुतांश नागरिक पूर्णत: सुरक्षित असल्याचा अनुभवदेखील अनेकांना येत आहे. त्यामुळे आता लस घेण्याबाबत प्रत्येकजण धडपड करीत आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्याची कार्यवाही सुरू झाली होती. पाच दिवसांतच या वयोगटातील सात हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लस घेतली. यामुळे मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळणे दुरापास्त झाले. ही परिस्थिती लक्षात घेता, शासनाने तडकाफडकी निर्णय घेत ६ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचे आदेश देऊन आधी दुसऱ्या डोसकरिता पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याची सूचना आरोग्य विभागास केली. त्याची तत्काळ प्रभावाने अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली.
असे असले तरी लसीकरण केंद्रांवर कार्यरत नातेसंबंधातील कर्मचाऱ्यांची मनधरणी करीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील अनेक नागरिकांनी ६ मेनंतरही विनानोंदणी लस घेतल्याचा प्रकार शहरी भागासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर घडला आहे. हा प्रकार गंभीर असून, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर तत्काळ निर्बंध घालणे आवश्यक ठरत आहे.
लसीकरण केंद्रांवर तरुणांचीही होतेय गर्दी
जिल्हाभरात १३७ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ठिकाणी सध्या केवळ दुसऱ्या डोसकरिता पात्र असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाच लस देण्याच्या स्पष्ट सूचना आहेत; मात्र त्याकडे कानाडोळा करीत विनानोंदणी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर लागणाऱ्या रांगांमध्ये तरुणांचीही गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
१.२० लाख लोक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात कोरोना योद्धे म्हणून गणले गेलेले २९७० आरोग्यसेवक, ६५८३ फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासह ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले १ लाख १० हजार ७९४ नागरिक असे एकूण १ लाख २० हजार ३४७ जण कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ लसींचा तुटवडा जाणवू नये, या उद्देशाने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवून आधी दुसऱ्या डोसकरिता पात्र असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. असे असताना लसीकरण केंद्रांवर चुकीच्या पद्धतीने विनानोंदणी कोणाला लस दिली जात असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर असून चाैकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम