कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST2021-05-19T04:41:58+5:302021-05-19T04:41:58+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने, बहुतांश नागरिक ...

Corona also fled the heatstroke for fear | कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने, बहुतांश नागरिक घरातच आहेत. विविध आजारांचे रुग्णही घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळल्याचे चित्र आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने कुणाचाही बळी घेतल्याची नोंद नाही.

दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की, उष्णाघातापासून संरक्षण कसे करावे, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान तापमान साधारणत: ३९ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावे, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. कडक निर्बंधामुळे सकाळी ११ वाजतानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने बहुतांश नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताने कुणाचा बळी गेल्याची घटना घडली नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षीही २४ मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे उन्हाळ्यात बहुतांश नागरिक घरातच होते. गतवर्षीही जिल्ह्यात उष्माघाताने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. कोरोनापूर्वी उष्माघातापासून बचाव म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जात होती. गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकामी व्यस्त असल्याचे दिसून येते. उष्माघातासंदर्भात यंदा फारशा उपाययोजना दिसून येत नाहीत. दुपारच्या सुमारास सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. कोरोनाच्या भीतीने यंदा मे महिन्यात उन्हाचा चटकाच लागला नाही.

००००००००००००००००

ऊन वाढले तरी...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यानंतर, वातावरणातील बदलामुळे तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेक जण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.

०००००००

उन्हाळा घरातच!

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी तर मे महिन्यात कडक निर्बंध लागू आहेत. मेडिकल, दवाखाना, रुग्णवाहिका, अंतिम संस्कार आदी अत्यावश्यक कारणाशिवाय सकाळी ११ वाजतानंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा घरातच जात असल्याने ऊन लागण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. सकाळी ११ वाजतानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.

०००००००००००

उष्माघातापासून बचाव म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाते. या वर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही. कडक निर्बंध लागू असल्याने नागरिकही घरातच आहेत. उन्हापासून बचाव म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ.मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Corona also fled the heatstroke for fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.