तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विकासात्मक कामांची निश्चिती
By Admin | Updated: March 14, 2016 02:07 IST2016-03-14T02:07:42+5:302016-03-14T02:07:42+5:30
भाविक- भक्तांसाठी मूलभूत सुविधा निर्मिती करण्याच्या पालकमंत्र्यांचे निर्देश.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विकासात्मक कामांची निश्चिती
वाशिम: श्री संत सखाराम महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लोणी बु. चा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करताना पहिल्या टप्प्यात भाविक- भक्तांसाठी मूलभूत सुविधा निर्मिती करण्यावर भर देण्याच्या सूचना गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी १३ मार्च रोजी लोणी बु. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेऊन पहिल्या टप्प्यात घ्यावयाच्या कामांची निश्चिती करण्याबाबत सूचना दिल्या. पहिल्या टप्प्यात १0 कोटी १५ लाख रुपयांची विकास कामे होणार आहेत.
व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या चर्चेत वाशिम येथून आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, रिसोडचे तहसीलदार अमोल कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता ओ. के. बारापात्रे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता ए. डी. बेले यांच्यासह संत सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त एस. डी. जोशी सहभागी होते. पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान लोणी बु. येथे होणार्या यात्रेला सुमारे ४ लाख भाविक-भक्त उपस्थित राहतात. या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासह गावाला जोडणारे रस्ते, मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या बाजूच्या भूमिगत गटारींचे काम, पालखी व रथ परिक्रमा मार्ग यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे. या सर्व कामांमध्ये संबंधित यंत्रणांनी सुसूत्रता ठेवावी. नोव्हेंबर २0१६ पूर्वी ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. लोणी बु. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट कामांचे सादरीकरण केले.