शैक्षणिक शुल्काच्या तक्रारीची दखल; शुल्कात ४० टक्के कपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:09+5:302021-09-27T04:45:09+5:30
रिसोड : रिसोड येथील गंगा मां विद्यामंदिरमधील शैक्षणिक शुल्काबाबत पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी घेतली. ...

शैक्षणिक शुल्काच्या तक्रारीची दखल; शुल्कात ४० टक्के कपात!
रिसोड : रिसोड येथील गंगा मां विद्यामंदिरमधील शैक्षणिक शुल्काबाबत पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी घेतली. शाळेने शुल्कात ४० टक्के कपात केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी शिक्षण घेतलेल्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरल्याशिवाय शाळेचा दाखला दिला जाणार नाही, असा पवित्रा शाळेतील कर्मचाऱ्यांनी व स्थानिक प्रशासनाने घेतला होता. कोरोनासदृश्य आजाराची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन झाले होते, त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची फी भरण्यास ते सक्षम नव्हते. विद्यार्थ्यांचे पालक रोज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची टीसी मागत होते; परंतु शाळा प्रशासनाकडून संपूर्ण फी भरल्याशिवाय त्यांना दाखला मिळत नव्हता. रिसोड शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलच्या दोन्हीही शालेय प्रशासनाने फीमध्ये ५० टक्के सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आमचीसुद्धा फी माफ करावी, असा आग्रह पालकांकडून होत होता. मात्र, न्याय मिळत नसल्यामुळे ते कंटाळले होते. अखेर त्यांनी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांना भेटून आमच्या पाल्याचे वर्ग अकरावीचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळेत प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना टीसी मागत आहेत. या परिस्थितीचा विचार करता गंगा मां इंग्लिश स्कूलच्या शालेय प्रशासनाला सरनाईक यांनी विनंती करून सदर विद्यार्थ्यांची फी काही प्रमाणात माफ करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्याचा विचार करता शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ४० टक्के सवलत दिली. ॲड. सरनाईक यांच्या कार्यतत्परतेमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.