भगर विषबाधा प्रकरणाची दखल; वाशिम जिल्ह्यात बेस्ट बिफोरचा उल्लेख न करणाऱ्या ९ आस्थापनांवर कारवाई
By दादाराव गायकवाड | Updated: September 29, 2022 17:33 IST2022-09-29T17:33:21+5:302022-09-29T17:33:52+5:30
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये भगरीमुळे झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, वाशिम कार्यालयातर्फे मालेगाव तालुक्यात विविध दुकानांची तपासणी करत भगरेचे दोन नमुने विश्लेषणास घेतले आहे.

भगर विषबाधा प्रकरणाची दखल; वाशिम जिल्ह्यात बेस्ट बिफोरचा उल्लेख न करणाऱ्या ९ आस्थापनांवर कारवाई
वाशिम: मिठाईच्या दुकानात पदार्थांच्या पाकिटांवर बेस्ट बिफोरचा उल्लेख न करणाऱ्या एकूण ९ आस्थापनांवर कारवाई करत ३३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, कमी दर्जाचे किंवा असुरक्षित अन्न पदार्थ विक्री केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) सागर तेरकर यांनी २९ सप्टेंबर रोजी दिली.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये भगरीमुळे झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, वाशिम कार्यालयातर्फे मालेगाव तालुक्यात विविध दुकानांची तपासणी करत भगरेचे दोन नमुने विश्लेषणास घेतले आहे. तसेच विविध खाद्यपदार्थांचे एकूण ३७ नमुने संकलित करण्यात आले असून, या सर्व नमुन्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. अन्न औषध प्रशासन विभागाने सणासुदीच्या काळात जिल्ह्यात खाद्यतेलाचे ९ नमुने, तुपाचे ४ नमुने, दुधाचे ८ नमुने, दहीचे ३ नमुने, मिठाईचे ३ व इतर अन्नपदार्थांचे ८ नमुने असे एकूण ३७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.