काजळेश्वर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:38+5:302021-09-27T04:45:38+5:30
काजळेश्वरसह परिसरातील जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर, पलाना, खांदला, धानोरा जहाॅ. विराहित आदी गावांत शनिवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात ...

काजळेश्वर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; जनजीवन विस्कळीत
काजळेश्वरसह परिसरातील जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर, पलाना, खांदला, धानोरा जहाॅ. विराहित आदी गावांत शनिवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तीन तास एकसारखा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय होऊन घराघरांत पावसाचे पाणी शिरल्याने गावांना तलावाचे रूपच प्राप्त झाले होते. ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही यामुळे अशक्य झाले होते. काजळेश्वर परिसरात या पावसामुळे विक्रमी पावसाची नोंदही झाली. या तीन तासांत काजळेश्वरात १३० मि.मी., तर जानोरीत १२० मि.मी. पावसाची नोंद झाली.
०००००००००००००००
शेतशिवारालाही तलावाचे रूप
काजळेश्वर परिसरात शनिवारी आलेल्या पावसामुळे शिवाराला तलावाचे रूप प्राप्त झाले. शिवारातील विहिरी पावसामुळे ओसंडून वाहू लागल्याचे चित्र दिसू लागले. या पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनसह इतर पिके जमीनदोस्तच झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
००००००००००००००००
कोट: काजळेश्वर परिसरात शनिवारी विक्रमी पावसाची नोंद झाली. सतत तीन तास कोसळलेल्या पावसामुळे शिवारातील सर्वच पिके नेस्तनाबूत झाली. प्रशासनाने या पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
-नितीन उपाध्ये,
शेतकरी, तथा माजी ग्रामपंचायत सदस्य