रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:01 IST2020-08-11T18:00:04+5:302020-08-11T18:01:00+5:30
मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला.

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रारंभ झाला खरा; परंतू मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथील महोत्सव लांबणीवर पडला.
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी भागात राहणाºया नागरिकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाणी ‘रानभाजी महोत्सव २०२०’ साजरा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिमचा अपवाद वगळता उर्वरीत पाच शहरांमध्ये तालुकास्तरावर ११ आॅगस्टपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना आणि पावसामुळे या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. मानोरा येथे रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांनी पाठ फिरविली. दुपारी दीड वाजेपर्यंतही अधिकारी किंवा पदाधिकारी महोत्सवस्थळी पोहचले नव्हते. बचत गटांनी रानभाजीचे स्टॉल लावले होते. परंतू, त्यांना शहरवासियांची प्रतिक्षा होती. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथे रानभाजी महोत्सव लांबणीवर पडला. दोन, तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी सांगितले. कारंजा येथे महोत्सवाचा शुभारंभ होताना, काही नागरिकांची उपस्थिती होती. परंतू, त्यानंतर स्टॉलवर फारसे कुणी नव्हते. मंगरूळपीर येथे महोत्सवाला बºयापैकी प्रतिसाद मिळाला.