Citizens queue for Aadhaar registration at RISOD! | रिसोड येथे आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा कायम !

रिसोड येथे आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा कायम !

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोडसह जिल्ह्यात आधार नोंदणी केंंद्रांचा प्रश्न निकाली निघाला नसून, आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. रिसोड शहरात पोस्ट आॅफिस कार्यालयासमोर दररोज रांग लागत असतानाही याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अनेक नागरिक तसेच विद्यार्थी हे आधार कार्डपासून वंचित आहेत. आधार नोंदणीसाठी जिल्ह्यात अत्यल्प नोंदणी मशिन पुरविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत ही सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू, राष्ट्रीयकृत बँकेतदेखील आधार नोंदणीची सुविधा नियमित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दोन महिन्यापूर्वी रिसोड शहरात आधार कार्डची नोंदणी करण्यासाठी एकमेव डाक कार्यालयात (पोस्ट आॅफिस) सुविधा उपलब्ध होती. मध्यंतरी तांत्रिक बिघाडामुळे सदर मशिन बंद पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे लक्ष दिल्याने शेवटी पोस्ट आॅफिसमध्ये आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली. अन्य ठिकाणी आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध नसल्याने आधार नोंदणीसाठी पिूरता गोंधळ उडत आहे. अशीच परिस्थिती वाशिम, मालेगाव यासह अन्यत्र देखील आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २० पेक्षा अधिक ठिकाणी आधार मशिन पुरविण्यात आल्या. परंतू, चालान व अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याने आधार नोंदणीसाठीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Citizens queue for Aadhaar registration at RISOD!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.