सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव बहुमताने पारित!
By Admin | Updated: April 19, 2017 01:10 IST2017-04-19T01:10:09+5:302017-04-19T01:10:09+5:30
रिसोड : येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठरावावर मंगळवार, १८ एप्रिल रोजी शून्य विरुद्ध १२ सदस्यांनी एकमत दर्शविल्याने ठराव बहुमताने पारित झाला.

सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव बहुमताने पारित!
रिसोड पंचायत समिती : १८ पैकी १२ सदस्यांनी लावली हजेरी
रिसोड : येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठरावावर मंगळवार, १८ एप्रिल रोजी शून्य विरुद्ध १२ सदस्यांनी एकमत दर्शविल्याने ठराव बहुमताने पारित झाला. यायोगे याप्रकरणी व्यक्त होणाऱ्या शंका, कुशंकांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
पंचायत समिती सभापती प्रशांत खराटे आणि उपसभापती विनोद नरवाडे हे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार चालवित असल्याचा ठपका ठेवत महादेव ठाकरे, शारदा आरु, केशव घुगे, कमल करंगे, गजानन बाजड, छाया पाटील, श्रीकांत कोरडे, नागो गव्हाळे, चंद्रकला बांगरे, ज्योती मोरे, यशोदा भाग्यवंत, कावेरी अवचार या १२ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ एप्रिल रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी निवडणूक पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या अधिपत्याखाली सभा बोलावली होती; मात्र यावेळी १८ पैकी १२ सदस्यच उपस्थित राहिल्याने सभापती, उपसभापतींवर शून्यविरुद्ध १२ असा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. ठराव मंजूर झाल्याने सभापती व उपसभापतींची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे लवकरच नवीन सभापती, उपसभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविल्या जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. सभेचे कामकाज उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी डी.एस.मकासरे यांनी पाहिले.
महादेव ठाकरे, छाया पाटील यांची नावे चर्चेत!
रिसोड पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदावर भाजपाच्या छाया पाटील आणि उपसभापती म्हणून शिवसेनेचे महादेव ठाकरे आरूढ होतील, अशी चर्चा सध्या रिसोड तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.