मालेगाव (जि. वाशिम): अचानक टायर फुटल्याने, कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. यामध्ये तीन जण गंभीर झाले असून, ही घटना २४ मार्चला मालेगाव-वाशिम मार्गावरील झोडगा फाट्याजवळ सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास घडली.एमएच २८ सी ४0२४ क्रमांकाच्या कारने शुभम धोंगडे, विनोद राऊत व उमेश तायडे हे मालेगाववरून वाशिमला जात होते. दरम्यान, झोडगा फाट्याजवळ कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावर ताबा सुटला. कार नियंत्रणात येण्यापूर्वीच रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर आदळली. यामध्ये चालक शुभम गजानन धोगंडे (वय ३0), विनोद काशीराम राऊत, उमेश प्रकाश तायडे (२५) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारार्थ तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मालेगाव पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी चालकाविरुद्ध भादंवी कलम २७९, ३३७, १८४, ५३ नुसार गुन्हय़ाची नोंद करण्यात आली.