सोयाबीन हंगामामुळे उमेदवारांची होणार दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST2021-09-15T04:47:05+5:302021-09-15T04:47:05+5:30
सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसी संवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेणे क्रमप्राप्त झाले. निवडणूक ...

सोयाबीन हंगामामुळे उमेदवारांची होणार दमछाक!
सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसी संवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेणे क्रमप्राप्त झाले. निवडणूक आयोगाने १९ जुलै रोजी रिक्त जागांवर निवडणूक घेण्याचे आदेशही काढले होते. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर १९ जुलै रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली. पुढे निवडणूक होणार की नाही, ओबीसी आरक्षणाचे काय अशा बऱ्याच चर्चा रंगत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक लांबणीवर टाकण्याचा अधिकार नाही असे म्हटले. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यात ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी शिरपूर व परिसरात सोयाबीन हंगामाला सुरुवात होणार आहे. परिसरातील मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात शेतमजूर व शेतकरी आहे. मजूर आणि शेतकरी सोयाबीन हंगामाला महत्त्व देणार असल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी दमछाक होणार हे मात्र निश्चित आहे. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिरपूर पंचायत समिती भाग दोनसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ३४०० पुरुष, २९८२ स्त्री मतदार अशा ६३८२ पैकी किती मतदार मतदान करतात हे ५ ऑक्टोबर रोजी दिसून येईल.