अपघातात कार जळून खाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:43+5:302021-02-06T05:16:43+5:30
किन्हिराजा : नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या कारने ऑटोला दिलेल्या धडकेत कार जळून खाक झाल्याची घटना ३ ...

अपघातात कार जळून खाक !
किन्हिराजा : नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या कारने ऑटोला दिलेल्या धडकेत कार जळून खाक झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.
नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरुन गोंदिया येथून बीडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एम.एच. २१ व्ही ३६०६ या क्रमांकाच्या कारने शेलुबाजारकडून मालेगावकडे जात असलेल्या एम.एच. ३७ ई या क्रमांकाच्या ऑटोला उमरदरी फाट्यावर मागून जोरदार धडक दिली. हा ऑटो गणेशपूर येथील गोपाल लक्ष्मण राठोड (३६) यांच्या मालकीचा आहे.
या अपघातात ऑटोमधील उमरदरी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरिता वाशिम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघात घडल्यानंतर ही कार एका झाडावर आदळल्याने कारने पेट घेतला. कारने पेट घेण्यापूर्वी सुदैवाने कारचालक गणेश गिरधारीलाल मालु (४८), त्यांची पत्नी मंजुश्री (४१) व आई चंद्रकला (६५) हे तिघेजण सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदिनाथ मोरे, किन्हीराजा पोलीस चौकीचे कर्मचारी नीलेश घुगे, वानखेडे, महेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.