बोगस पावतीआड रेतीची अवैध वाहतूक
By Admin | Updated: January 28, 2016 23:38 IST2016-01-28T23:07:50+5:302016-01-28T23:38:30+5:30
१७ पैकी तीन रेतीघाटांचा लिलाव; गौण खनिज चोरीचे मराठवाडा कनेक्शन उघड.

बोगस पावतीआड रेतीची अवैध वाहतूक
संतोष वानखडे /वाशिम: बोगस किंवा बनावट पावतीच्या नावाखाली मराठवाड्यातून वाशिम जिल्ह्यात गौण खनिजाची सर्रास अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर येत आहे. एका महिन्यापूर्वी वाशिम तहसीलच्या पथकाने जप्त केलेली सेनगाव तहसीलची पावती बनावट असल्याचे समोर आल्याने, रेती चोरीचा गोरखधंदा उजागर झाला. २0१५ या वर्षात जिल्ह्यावर वरुणराजा रूसला. अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने बाजारपेठेत फारशी उलाढाल नाही. बांधकाम क्षेत्रालादेखील कोरड्या दुष्काळाची झळ बसली. यामुळे रेतीघाटांचे लिलावही पूर्ण होऊ शकले नाहीत. जिल्ह्यात एकूण १३२ रेतीघाट असल्याची नोंद गौण खनिज विभागाच्या दप्तरी आहे. गत दोन वर्षांपासून रेती घाटांचा लिलाव करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने २0१५ मध्ये पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या रेतीघाटांची संख्या २७ वर आली. यावर्षी रिसोड, वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तहसीलदारांनी तालुक्यातील रेतीघाटांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने मंजुरीसाठी सदर प्रस्ताव भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे सादर केले. मात्र, यापैकी रेतीचा उपसा करण्यासाठी १७ प्रस्ताव योग्य असल्याचा अहवाल पर्यावरण विभागाने दिल्याने १७ घाटांचे लिलाव होणार आहे. यापैकी तीन लिलाव झाले असून उर्वरीत लिलाव कार्यवाहीत असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांची रेतीची गरज भागविण्यासाठी अनेकांनी रेती तस्करीची ह्यदुकानदारीेह्ण सुरू केल्याची माहिती आहे. मराठवाड्यातून रिसोड किंवा वाशिम तालुक्यात रेतीची सर्रास वाहतूक होत आहे. वाशिम तहसीलने मराठवाड्यातून येणार्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवून दंडात्मक कारवाया केल्या. एका महिन्यापूर्वी एका वाहतुकदाराने सेनगाव तहसीलची पावती दाखविली. मात्र, सदर पावतीबाबत शंका उपस्थित झाल्याने पडताळणीसाठी जिल्हा गौण खनिज कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर सदर पावती सेनगाव तहसीलदाराची नसल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित वाहतुकदाराकडून दंड वसूल केला. पावती बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे का टाळले? हा प्रश्न खूप काही सांगून जात आहे. अशा बोगस पावतीच्या पदराआड सेनगाव तालुक्यातून रिसोड तालुक्यात गिट्टी, रेती आदी गौण खनिजाची सर्रास वाहतूक केली असल्याचे चित्र आहे.