अवैध गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST2021-08-20T04:48:09+5:302021-08-20T04:48:09+5:30
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस.एम. सारसकर नामक दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नंबरवर ...

अवैध गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस.एम. सारसकर नामक दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नंबरवर मिळाली होती. या माहितीच्या आधारावर १८ ऑगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चमूने सायंकाळी ६ वाजेदरम्यान शहर पोलिसांच्या मदतीने छापा मारला. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील एक ४० वर्षीय महिला गर्भपाताकरिता १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून भरती असल्याचे व तिच्यावर गर्भपाताकरिता उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. साहित्य जप्त करून आरोपी डॉ. सारसकर व विलास ठाकरे नामक बोगस डॉक्टरलाही अटक करून वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
०००००००
महिलेची प्रकृती धोक्याबाहेर
गर्भपाताचे उपचार करण्यात आलेल्या महिलेला जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सुरक्षित गर्भपातानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. तिच्याकडे हिंगोली येथील एका सेंटरमधील सोनोग्राफी रिपोर्ट आढळून आला.
०००००
हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्या
जिल्ह्यामध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती नागरिकांकडून गोपनीयरीत्या प्राप्त होण्यासाठी ८४५९८१४०६० हा स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्यांना १ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. नागरिकांनी अवैध गर्भपात, गर्भलिंगनिदान याविषयीची माहिती हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले.