मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला; इचोरी येथील खून प्रकरण
By संतोष वानखडे | Updated: June 11, 2023 19:25 IST2023-06-11T19:25:27+5:302023-06-11T19:25:37+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ईचोरी येथील मुलाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या पित्याचा मृतदेह ११ जून रोजी ईचोरी शेतशिवारात आढळून आला.

मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी पित्याचा मृतदेह आढळला; इचोरी येथील खून प्रकरण
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ईचोरी येथील मुलाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या पित्याचा मृतदेह ११ जून रोजी ईचोरी शेतशिवारात आढळून आला. रेखा नंदू घोडके (३५) रा.ईचोरी यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी नंदू आत्माराम घोडके (पती) (वय ४५) रा. ईचोरी याने ६ जूनच्या रात्री फिर्यादी ही राहत्या घरी झोपली असताना, शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून फिर्यादी पत्नीशी वाद घातला होता.
वादाचे पर्यावसान हाणामारीत होउन नंदूने पत्नी रेखा, मोठा मुलगा हरिओम घोडके (१७) व लहान मुलगा महादेव घोडके (१४) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते. ८ जून रोजी यामधील गंभीर जखमी हरिओम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी व दोन महिला विरुद्ध कलम ३०२, ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आरोपी नंदू घोडके हा फरार होता. दरम्यान ११ जून रोजी आरोपीचा मृतदेह ईचोरी शेतशिवारात आढळला. घटनेपासून आरोपी हा फरार असल्याने उपाशीपोटी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनेचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे करीत आहेत.