अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ हीच खरी मानवंदना ठरेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:18+5:302021-08-01T04:38:18+5:30
अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भाऊराव व आई वालूबाईच्या पोटी झाला. ...

अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ हीच खरी मानवंदना ठरेल...
अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भाऊराव व आई वालूबाईच्या पोटी झाला. बालपणापासूनच अण्णांना मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत आवड होती. एक कौशल्यपूर्ण खेळाडू म्हणूनही त्यांचा परिसरात नावलौकिक होता, घरचे अठरा विसवे दारिद्र्यामुळे अण्णांना पोट भरण्यासाठी वाटेगाव सोडून वडिलांसह मुंबईला प्रयान करावे लागले. तेथे मेरीबाईच्या धर्मशाळेत तळ ठोकला. त्याचवेळी भांडवलदारांच्या आणि गरिबांच्या मुंबईच दर्शन खऱ्या अर्थाने अण्णांना घडलं. गिरणीत काम करताना कामगारांच्या संप मोर्चाचे जवळून निरीक्षण करता आले . यावेळी क्रांतिकारकांच्या भाषणांचा विशेष प्रभाव अण्णावर पडला. १९३८ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कोंडाबाईसोबत विवाह झाल्याने कुटुंबाचे पालन पोषणाची जबाबदारी त्यांचेवर येऊन पडली. मिलमधील काम सुटल्याने अण्णांना घरी परतावे लागले. वाटेगावात बापू साठेंच्या तमाशात सहभाग घेतला. यावेळी गोवामुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेऊन शाहिरीद्वारे प्रचार व जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. १९४२ मध्ये बर्डे गुरुजींसोबत चलेजावच्या चळवळीत सहभाग घेतल्याने ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट काढल्याने अण्णांना पुन्हा भ्रमंती करत मुंबईला यावे लागले. याच काळात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रचारकासह, लेखक, आणि शाहिरी लेखनास प्रारंभ केला. १९४५ मध्ये त्यांची ‘‘चित्रा’’ ही पहिली कादंबरी सोव्हियत रशियामध्ये प्रकाशित झाल्यानंतर गुलाम, बरबाद्या कंजारी, झेक, पोलंड आणि जर्मन भाषेत प्रकाशित झाल्या. त्यामुळे प्रतिभा संपन्न साहित्यिकाचा झेंडा त्यांनी फडकवला. त्याच कारणाने पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक साहित्य परिषदेचे निमंत्रण अण्णांना मिळाले. १९५६ मध्ये मुंबई सरकारने त्यांच्या लालबावटा या कला पथकावर बंदी आणल्याने तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक उग्र करण्यासाठी शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांनी जिवाचे रान केले . प्रसंगी भूमिगत राहूनही कार्य केले. १९५९ मध्ये अण्णांची फकिरा ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली. १९६०मध्ये या कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर १९६१ मध्ये शासनाने या कादंबरीला प्रथम पारितोषिक देऊन अण्णा भाऊंच्या साहित्य कृतीचा गौरव केला. शारदेच्या दरबारी आज कित्येक शतकानुशतके तमासगिरांचे डफ, तुणतुणे, वाजत आहे, त्याला कला, काव्य आणि कंठ याचं चिरंतर इंद्रधनुष्यच अण्णांनी उभारून ठेवला आहे. मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावून समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत व्हावी म्हणून शासनाने ११ जुलै १९८५ रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून अण्णांच्या कार्य कर्तृत्वाचा यथोचित सन्मान केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी मास्तरांच्या छातीत दगड मारून शाळेचा श्रीगणेशा आणि तोच शेवट करून शालेय शिक्षणाचा गंधही नसलेल्या अण्णा भाऊंनी उच्च विद्याविभूषितांनाही लाजवेल अशी कीर्ती मिळवली. साहित्यक्षेत्रात सातासमुद्रापार गगन भरारी घेत अखंड महाराष्ट्राच्या लढाईत योगदान देऊन कामगारांसाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णांना शासनाने भारतरत्न हा मानाचा किताब देऊन त्यांचा सन्मान करावा यासाठी मातंग समाजबांधव गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र त्याकडे शासनकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने समाजात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन हे वर्षे अण्णांचे जन्मशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करीत असले तरी, या वर्षात अण्णा भाऊंना भारतरत्न या किताबाने सन्मानित करणे हीच खरी अण्णा भाऊंना मानवंदना ठरणार आहे.
अण्णा भाऊ : साहित्याचा धनी
साहित्य प्रकारातील लेखन केलेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम साहित्यिक म्हणून कीर्तिवान ठरले. १९३२ साली वडिलांसोबत मुंबईला आले. मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दु:खचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांच्या लढाऊपणा त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यानंतर ते कम्युनिष्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. डॉ. आंबेडकरांपासून सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी अनुभवली. चुलत भावाच्या तमाशाच्या फडात काम करत असताना तमाशातून जुन्या चालीचा साठा अण्णा भाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परताच त्यांना मॅक्झिम गोर्किचे साहित्य वाचायला मिळाले. लेखनाची उर्मी त्यांना यांच साहित्यानं दिली. तो काळ १९४२च्या चळवळीचा होता. हेवेदावे, गरीब जनतेला मिळणारी वागणूक ,दारिद्र्याचा झगडा अनुभवत त्यांनी प्रतिभेला बहर आला. त्यावेळी शाहीर अमर शेख यांच्याबरोबर अण्णा भाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला प्रेरणा देत शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया कायली’ ही लावणी अजरामर केली. कष्टकऱ्यांच्या व्यथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटवल्यात. अत्यंत अल्पशिक्षित असले तरी शाहिरीला उपजत चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड दिली.
वसंतराव जोगदंड (शिक्षक)
श्री शिवाजी हायस्कूल, हराळ
मो. ९६५७०७१००१