ग्रामीण डॉक्टरांनो सावधान, विनापरवानगी उपचार पडणार महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:26 IST2021-05-26T11:26:41+5:302021-05-26T11:26:46+5:30
Washim News : असा प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ग्रामीण डॉक्टरांनो सावधान, विनापरवानगी उपचार पडणार महागात
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुसºया लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मे महिन्यात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर असून, ग्रामीण भागात अजूनही काही डॉक्टर कोरोना रुग्णांवर विनापरवानगी उपचार करीत असल्याचे समोर आले आहे. अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत केले असून असा प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पहिल्या लाटेत जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता.मालेगाव) येथे पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. दुसºया लाटेत फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. एप्रिल महिन्यापर्यंत शहरी भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून आले. मे महिन्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील १५ जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची आॅनलाईन पद्धतीने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी ग्रामीण भागातील गृहविलगीकरण शक्यतोवर बंद ठेवून संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर हे सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करताना, कोरोना चाचणीचा सल्ला देत नाहीत किंवा चाचणीसाठी सरकारी आरोग्य केंद्रांकडे पाठवित नसल्याचे समोर आले. यामुळे संदिग्ध रुग्णांपासून इतरांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. कोरोनासदृश लक्षणे असतानाही चाचणीचा सल्ला न देणारे, चाचणीसाठी न पाठविणाºया ग्रामीण डॉक्टरांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ˘
याशिवाय कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अशा डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. विनापरवानगी कोरोना रुग्णांवर उपचार करणे, कोरोना चाचणीसाठी रुग्णांना आरोग्य केंद्रात न पाठविणाºया डॉक्टरांना यापुढे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कारवाईत सातत्य हवे !
विनापरवानगी कोरोना रुग्णावर उपचार करणे, संशयास्पद पदवी आढळणे याप्रकरणी २४ मे रोजी कारंजा शहरातील एका खासगी डॉक्टरवर संयुक्त पथकाने कारवाई केली आहे. यापूर्वीदेखील ग्रामीण भागातील दोन बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती. हे तीन अपवाद वगळले तर बोगस डॉक्टरवर ठोस कार्यवाही नाही. मान्यताप्राप्त विद्यापिठाची वैद्यकीय पदवी किंवा पदविका नसणे, विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, परवानगी नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार करणे आदी प्रकरणी ग्रामीण भागात शोध घेतला जाणार आहे. या कारवाईत सातत्य हवे, असा सूर उमटत आहे.