आघाडी व शिवसेनेत रंगणार लढाई
By Admin | Updated: July 12, 2014 23:07 IST2014-07-12T23:07:41+5:302014-07-12T23:07:41+5:30
नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीने राजकारण तापले

आघाडी व शिवसेनेत रंगणार लढाई
वाशिम : आगामी १४ जुलै रोजी होवू घालतलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीने शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापविले आहे. जिल्हा विकास आघाडी, शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस सद्या या निवडणूकीच्या कुरूक्षेत्रात उतरले असले तरी ऐनवेळी राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावेळीही जिल्हा विकास आघाडी विरूद्ध शिवसेना अशीच लढाई राहणार आहे. २७ सदस्य संख्या असलेल्या वाशिम नगर पालिकेत सत्तास्थापणेसाठी १४ सदस्यांची आवश्यकता आहे. परंतु सद्यस्थितीत कुठल्याच पक्षाकडे हा जादुई आकडा नाही. पालिकेत जिल्हा विकास आघाडीचे १२, शिवसेनेचे ९ , राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच व कॉग्रेसचे एक नगरसेवक आहेत. गत अडीच वर्षापूर्वी ेिजल्हा विकास आघाडीने राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधून सत्तेचा गाडा हाकला. नगराध्यक्षपद स्वत: कडे ठेवणार्या आघाडीने उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला दिले होते. यावेळी राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला आहे. नव्हेतर विद्यमान उपाध्यक्ष सायराबी सलीम बेनिवाले यांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकनही दाखल केले आहे. मात्र जिल्हा विकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असुन गत वेळची युती अभेद्य ठैवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता नकारता येत नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या कृष्णाताई कैलास गोरे यांनी ही नामांकन दाखल करून या निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. १३ जुलै ला नामांकन मागे घेतल्या जाणार आहे.