‘कोरोना’च्या चाचणीसाठी तीन प्रयोगशाळांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:15 IST2020-09-30T12:15:27+5:302020-09-30T12:15:35+5:30
दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होत आहे.

‘कोरोना’च्या चाचणीसाठी तीन प्रयोगशाळांचा आधार
वाशिम: जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर वेळेतच उपचार व्हावेत म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून संदीग्ध रुग्णांचे नमुने तीन प्रयोगशाळात पाठविले जात आहेत. अकोला, यवतमाळ आणि अमरावती येथील प्रयोगशाळेत जिल्ह्यातील संदीग्धांचे नमुने पाठविले जात आहेत. त्यामुळे दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होत आहे.
अनलॉक-४ ची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या कोरोना संसर्ग काळात संदीग्ध रुग्णांची वेळेत तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार न केल्यास स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पूर्वी जिल्ह्यातील बहुतांश संदीग्ध रुग्णांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील संदीग्धांचे अहवाल वेळेत मिळण्यास विलंब लागत होता. आता केवळ वाशिमसह रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील संदीग्धांचे नमुने अकोला येथे पाठविले जात आहेत, तर कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील संदीग्धांचे नमुने अमरावतीच्या प्रयोगशाळेत, तर मानोरा तालुक्यातील संदीग्धांचे नमुने यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यामुळे अहवाल दोन दिवसांत मिळत आहेत.
दिवसाला १५० ते १६० नमुन्यांचे संकलन
कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रॅपिड अॅन्टिजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. त्यात जिल्ह्यात एका दिवसांत सरासरी १५० ते १६० नमुने घेतले जातात. त्यामध्ये वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात मिळून जवळपास ७०, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात मिळून ५० ते ६०, तर मानोऱ्यातून २५ ते ३० संदीग्धांच्या नमुन्यांचा समावेश असतो.
संदीग्ध व्यक्तींच्या कोरोनाविषयक चाचणीचे अहवाल लवकर प्राप्त व्हावे, यासाठी अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविले जात आहेत. त्यामुळे दोन दिवसांत अहवाल प्राप्त होत आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम