पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टाला बॅकांचा ‘खो’
By Admin | Updated: December 24, 2014 00:39 IST2014-12-24T00:39:36+5:302014-12-24T00:39:36+5:30
वाशिम जिल्ह्यातील प्रकार; जिल्हा बँकेचा भोपळाच : राष्ट्रीयकृत, कर्मशिअल तथा ग्रामीण बॅकांचाही शेतक-यांशी असहकार.

पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टाला बॅकांचा ‘खो’
शिखरचंद बागरेचा / वाशिम: खरिप हंमागातील नापीकीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना रब्बीच्या पेरणींसाठी पिक कर्ज वाटण्यात बँकानी आखडता हातच घेतला असल्याची माहीती हाती आली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाही शेतकर्यांना पिक कर्ज दिले नाही, तर राष्ट्रीयकृत बँकानीही कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट पूर्तीला खो दिल्याचेच आकडेवारीवरून दिसून येत आहे. विविध राष्ट्रीयकृत बँकाकडुन ३0 नोव्हेंबर पर्यंंत वाटण्यात आलेल्या पिक कर्जाची टक्केवारी केवळ १९ एवढीच आहे.
जिल्ह्यात बारा राष्ट्रीयकृत , तीन खासगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांद्वारे शेतकर्यांना पिक कर्ज मिळणे अपेक्षी असते. खरिप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षीच उदिष्टापेक्षा दिडपट अथवा त्याही पेक्षा अधिक पिक कर्ज वाटते. राष्ट्रीयकृत बँका मात्र खरिप असो अथवा रब्बी नेहमीच पिक कर्जासाठी आखडता हात घेतात. यंदाच्या रब्बी हंगामातही पिक कर्ज वाटपात बॅकानी येरे माझ्या मागल्या ची भूमिका कायम ठेवली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकाना ५१ कोटी रूपयांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र सदर बँकानी ३0 नोव्हेंबर पर्यंंत केवळ १९८७ खातेदारांना नऊ कोटी ५९ लाख रूपयांचेच कर्ज वितरित केले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अग्रस्थानी आहे. सदर बॅकेने नोव्हेंबर अखेर पर्यंंत ७४७ शेतकरी खातेदारांना तीन कोटी ८५ हजार रूपये कर्ज वाटप केले आहे. तर सर्वात पिछाडीवर सिंधीकैट बॅक आहे. या बॅकेने केवळ दोन शेतकर्यांना दोन लाख रूपयांचे कर्ज वाटत केले आहे. राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच कर्मशिअल बॅकांची परिस्थिती आहे. आयसीआयसीआय बॅकेचा अपवाद वगळता अन्य बॅकांनी शेतकर्यांना रब्बीचे कर्ज वाटपात ठेंगाच दाखविला आहे.
*जिल्हा बॅकेचा भोपळाच
यंदाच्या खरिप हंमागात १३0 टक्के पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार्या दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नोव्हेंबर अखेर पर्यंंत एकाही शेतकर्यांला रब्बी हंगामासाठी पिक कर्ज दिले नव्हते. शेतकर्यांकडुन मागणी नसल्यामुळेच बँक कर्ज वितरीत करू शकली नाही अशी माहीती आता समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी खरिप हंगामामध्ये पिक कर्ज योजनेचा लाभ घेतात. मार्च महिन्यात कर्जाचा भरणा केल्यानंतर पून्हा एप्रिल अथवा त्यांनतर शेतकर्यांना बँक कर्जपुरवठा करते.