सरपंच, सचिवांकडून मासिक सभा घेण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:46+5:302021-07-31T04:41:46+5:30
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, २ फेब्रुवारीपासून भर जहागिर ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा घेण्यात आली नाही. ...

सरपंच, सचिवांकडून मासिक सभा घेण्यास टाळाटाळ
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, २ फेब्रुवारीपासून भर जहागिर ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा घेण्यात आली नाही. त्यामुळे गावातील समस्या मांडता येत नाहीत. याबाबत सरपंच यांना वारंवार माहिती दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही, तर ग्रामसचिव गावात हजर राहत नाहीत. सरपंच यांना याबाबत विचारणा केली असता कोरोना संसर्गामुळे मासिक सभा घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले, तर कोरोना काळात गावातील जबाबदारी ग्रामसचिवावर असतानाही ग्रामसचिव गावात उपस्थित राहत नाहीत. दुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी , कृषी सहाय्यक, पोलीस पाटील मात्र गावात उपस्थित राहतात. गावात १४ व्या वित्त आयोगाची कामे सुरू असून, गावात ग्रामसचिव हजर नसताना ही कामे कशी केली जातात, असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत असून, गावातील पथदिवे बंद आहेत, गावात डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे, गावातील नालेसफाईची कामे झाली नाहीत, अशा विविध समस्यांचा सामना ग्रामस्थ करीत आहेत.
------------
ऑनलाइन सभा घेण्यातही उदासीनता
कोरोनामुळे ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा घेता येत नाही तर, ऑनलाईन सभा घेऊन गावातील समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणीही उपसरपंच व सदस्यांनी सरपंच यांच्याकडे केली होती परंतु याबाबत आपण लवकरच विचार करून, असे आश्वासन देऊनसुद्धा अद्याप एकही सभा घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.