दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता!
By संतोष वानखडे | Updated: August 13, 2023 20:49 IST2023-08-13T20:48:55+5:302023-08-13T20:49:03+5:30
शासकीय कामात अडथळा : एका जणावर गुन्हाशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर १३ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता!
वाशिम : विद्युत पुरवठा बंद का करता असे म्हणत वाईगौळ येथील एका इसमाने लाईनमन समजून तलाठ्याच्या पोट्यात दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तलाठ्यांनी बाॅटल पकडल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी पोहरादेवी (ता.मानोरा ) परिसरात घडली असून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर १३ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी दौलत ज्ञानबा सावळे (तलाठी, पोहरादेवी) यांच्या तक्रारीनुसार पोहरादेवी विकास आराखड्यातील कामाकरीता पोहरादेवी येथे गट क्रमांक १३ ही जागा दाखविण्याकरीता महावितरणच्या अभियंत्यांनी तलाठी सावळे यांना ८ ऑगस्ट रोजी बोलाविले होते. मंडळ अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीने दौलत सावळे हे दुपारी २ वाजता कोतवाल व अभियंत्यांसह घटनास्थळी गेले असता, आरोपी संतोष उर्फ डुबा बालचंद राठोड रा. वाईगौळ हा तेथे हातात बियरची फुटलेली बाटली घेऊन बसून होता. आमची लाईन बंद का करता? असे म्हणून आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर धाऊन आला. शिवीगाळ करून हातातील बाटली पोटात मारण्याचा प्रयत्न केला असता, तलाठ्याने बाॅटल पकडली म्हणून पोटात लागली नाही.
मी लाईनमन नसून तलाठी आहे असे वारंवार सांगूनही आरोपीने गच्ची पकडुन बुक्क्यांनी मारहाण केली. सोबत असलेल्या लोकांनी सोडविले म्हणून जीव वाचला, असे सावळे यांनी फिर्यादीत नमूद केले. ८ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना घटना सांगितली आणि पोलिसात जाऊन हकीगत सांगितली. त्याच दिवशी वैद्यकीत तपासणी झाली; परंतू मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे नमूद करीत फिर्यादीने १३ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यावरून मानोरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०६ भा. दं.वी.नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्हापूरकर करीत आहेत.