..अन् अचानक कोसळले रिसोड येथील ठाणेदारांच्या कक्षातील छत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:23 IST2019-08-12T16:23:00+5:302019-08-12T16:23:05+5:30
या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली.

..अन् अचानक कोसळले रिसोड येथील ठाणेदारांच्या कक्षातील छत
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार नेहमीप्रमाणे आपल्या कक्षात बसून एका प्रकरणातील फिर्यादी व अन्य नागरिकांशी चर्चा करित असताना अचानक कक्षाचे जीर्ण झालेले छत खाली कोसळले. यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवार, १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ठाणेदारांना दुखापत झाली असून अन्य काही लोकही जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, रिसोड पोलिस स्टेशनच्या इमारतीला अनेक वर्षे उलटली असून ठाणेदारांच्या कक्षातील छतही जीर्ण झाले. या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून दुरूस्ती करण्यासंबंधी पोलिस प्रशासनाने यापुर्वी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागला कळविले; मात्र त्याची दखल घेतल्या गेली नाही. परिणामी, हे छत आज अचानकपणे कोसळले. या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली. तसेच यावेळी कक्षात बसून असलेले पोलिस पाटील मंगेश सरनाईक यांच्यासह अरूण साबळे, वंदना दीपक लाड यांनाही किरकोळ स्वरूपात मार लागला. जमीनदोस्त झालेल्या छताचे साहित्य हटविण्यासाठी पोलिस कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.