सोयाबीन अनुदानाची रक्कम लालफीतशाहीत!
By Admin | Updated: June 3, 2017 01:57 IST2017-06-03T01:57:22+5:302017-06-03T01:57:22+5:30
शेतकरी हवालदिल : अनुदानाची प्रतीक्षा

सोयाबीन अनुदानाची रक्कम लालफीतशाहीत!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आवश्यक त्या प्रस्तावांची पूर्तता केल्यानंतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळाली नाही. अनुदानाची रक्कम लालफीतशाहीत अडकली आहे.
१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांंना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. प्रती शेतकरी जास्तीत जास्त २५ क्विंटल याप्रमाणे पाच हजार रुपये अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले होते. त्यानुसार जिल्हाभरातील ५३ हजार ९६१ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले होते. सोयाबीन विक्रीपट्टीसह सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह प्रस्ताव देण्यात आले. सदर प्रस्तावांची छानणी सुरुवातीला तालुका सहायक निबंधक कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात छाननी करण्यात आली. ५३ हजार ९६१ शेतकऱ्यांना जवळपास २५ कोटी रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले.