सभामंडपाचा मोह आवरेना !
By Admin | Updated: July 24, 2014 23:56 IST2014-07-24T23:56:39+5:302014-07-24T23:56:39+5:30
एकूण निधीतील ४२ टक्के खर्च : सामाजिक व्होट बँक जपण्याचा प्रयत्न

सभामंडपाचा मोह आवरेना !
बुलडाणा : आमदारांना मिळणारा निधी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिला जातो. पायाभूत सुविधा निर्माण करतानाच नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवितात; मात्र या सर्व कामांच्या स्वरूपाचे विेषण केले असता सर्वाधिक निधी हा समाज मंदिर, सभामंडपावर खर्च झाला असून, त्या खालोखाल रस्त्यांसाठी निधी दिल्याचे स्पष्ट होते. आमदार निधीची कामे करताना राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून कामे करण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारसंघातील प्रत्येक समाजाला खूष करून आपली सामाजिक ह्यव्होट बँकह्ण कायम टिकवण्यासाठी सामाजिक सभागृह हे कमी खर्चात केले जाणारे विकासकामे करण्यातच सर्व आमदारांनी रस दाखविला आहे. विधानसभेच्या सात आमदारांनी गेल्या चार आर्थिक वर्षात तब्बल १३२ सभागृहांना मंजुरात करून घेतली आहे, त्यासाठी आपल्या आमदार निधीतील तब्बल ५0 टक्के निधी खर्ची टाकला आहे. विशेष म्हणजे या चालु आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्येही सभामंडपावरचा खर्च हा ४२ टक्के असून, आता शिल्लक राहिलेल्या निधीमध्येही सामाजिक सभागृहांचाच बोलबाला आहे. सभागृहानंतर रस्ता डांबरीकरण, खडीकरण व नाल्यांचे बांधकाम महत्त्वाचे ठरले असून, त्यासाठी ४ कोटी २३ लाख २१३ रूपये खर्च केले आहेत. दररोज विकास कामांचे भूमिपूजन करणारे आ.दिलीपकुमार सानंदा यांचा संपूर्ण आमदार निधी हा डांबरीकरण, सभागृह व नाल्या तसेच रस्त्यावर खर्च झाला आहे. तीच परिस्थिती आ. राहुल बोंद्रे यांचीही आहे. आ.डॉ.राजेंद्र शिंगणो, आ.विजयराज शिंदे व आ.डॉ.संजय कुटे यांनी सभामंडपासोबतच रस्त्यावर अधिक भर दिला आहे. आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी तर आपल्याला मिळालेल्या ६६ लाख ६६ हजाराच्या निधीपेक्षाही अधिक असा ९९ लाखाचा खर्च केला असून, त्यामध्येही सभागृह व रस्ते यावरच भर दिला तर आ.चैनसुख संचेतीसुद्धा त्याच मार्गावर मार्गक्रमण करताना दिसतात. आमदार डॉ.संजय कुटे यांनी ३ वाचनालयांना तर आमदार राहुल बोंद्रे यांनी शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी १0 लाखाचा निधी दिला आहे, हेच काय ते वेगळेपण. आमदार विजयराज शिंदे यांनी सभामंडपावर ४0 टक्के निधी दिला असून, सर्व आमदारांपेक्षा जास्त व्यायाम शाळांना निधी दिला आहे. यावर्षी प्रस्तावित केलेल्या सर्व कामांमध्ये प्रत्येक आमदाराचा ४२ टक्के खर्च हा सभामंडपांवरच झालेला आहे.