वाशिमात शौचालय बांधकामसंदर्भात लोककलावंतांचा ‘गजर’ ! चिमुकल्यांचाही सहभाग : विशेष कुटुंब संपर्क अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:26 IST2017-11-02T15:59:38+5:302017-11-02T19:26:31+5:30
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला.

वाशिमात शौचालय बांधकामसंदर्भात लोककलावंतांचा ‘गजर’ ! चिमुकल्यांचाही सहभाग : विशेष कुटुंब संपर्क अभियान
वाशिम: गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले.
वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी तसेच नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. लोटाबहाद्दरांविरूद्ध दंडात्मक कारवाई करतानाच, नागरिकांची मानसिकता बदलविण्यासाठी लोककलावंतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व हगणदरीमुक्त घोषित न झालेल्या गावांत प्रत्येक कुटुंबांशी संवाद साधता यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील चिखली, व्याड, रिठद या गावांना भेटी देण्यात आल्या. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरावर लाल रंगाचे (खतरा/धोका) स्टिकर लावण्यात आले. संबंधित कुटुंबाकडून शौचालय बांधकाम करण्याचे आश्वासन घेण्यात आले. शिरपूर जैन येथेही जनजागृती करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी येथे लोककलावंतांच्या माध्यमातून गजर करण्यात आला. चिमुकल्यांनीदेखील विविध घोषणा देत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले असून, गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेने नागरिकांना केले.