वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:37 PM2020-05-25T17:37:57+5:302020-05-25T17:38:13+5:30

वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते.

In the afternoon in Washim district, the market is silence | वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !

वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. परंतू, वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत दुपारी ३ वाजतानंतर शुकशुकाट असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर, कामगार येत असून, दक्षता म्हणून अनेक व्यापारी दुपारी ३ वाजतानंतर दुकाने बंद ठेवत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले.
वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत दुपारी २ वाजेपर्यंत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यानंतर हळूहळू गर्दी ओसरत असल्याचे २५ मे रोजी दिसून आले. दुपारी ३ ते ३.३० वाजतानंतर पाटणी चौकस्थित बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद करण्यात येतात. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो.
मालेगाव : राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. दरम्यान, अर्थचक्र थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न म्हणून राज्य शासनाने राज्यात रेड झोन व नॉन रेड झोनच्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना २१ मे रोजी जारी केल्या. त्यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून ‘लॉकडाऊन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी दुपारी २ वाजतानंतर मालेगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. तापते ऊन आणि कोरोना संसर्गाचा धोका यामुळे व्यापारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवत असल्याने बाजारपेठेत सामसूम दिसून आली.
केनवड : सकाळी ९ वाजतापासून केनवड येथील बसथांब्यावरील दुकानांमध्ये गर्दी दिसून येते. दुपारी २ ते ३ वाजतानंतर बहुतांश दुकाने बंद केली जातात. त्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट दिसून येतो. २५ मे रोजीदेखील केनवड येथील बाजारपेठेत दुपारी  ३ वाजतानंतर शुकशुकाट दिसून आला.
शिरपूर जैन : येथे २२ मे पासूनच दुपारी ३ वाजतानंतर सर्व बाजारपेठ बंद होत आहे. २५ मे रोजीदेखील शिरपूर येथील बाजारपेठेत दुपारी ३ वाजेनंतर सामसूम दिसून आली. शिरपूर परिसरात मोठ्या संख्येने परराज्य, परजिल्ह्यातून मजूर, कामगार येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका नको ्म्हणून प्रत्येकजण दक्षता घेत असल्याचे शिरपूर परिसरात दिसून येते.

Web Title: In the afternoon in Washim district, the market is silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.