अडाण नदीपात्र कोरडे पडले; टरबुज, खरबुजासह काकडीची पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:21 IST2019-03-27T17:44:54+5:302019-03-27T18:21:00+5:30
इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत.

अडाण नदीपात्र कोरडे पडले; टरबुज, खरबुजासह काकडीची पिके संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेल्या अडाण नदीचे पात्र जवळपास दीडशे मीटर रुंद असून, याच नदीवर मानोरा तालुक्यातील म्हसणी येथे अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या भरवशावर मानोरा तालुक्यातील २८ गावांसह कारंजा शहरातील नागरिकांची तहान भागविली जाते. त्याशिवाय याच प्रकल्पाच्या भरवशावर हजारो हेक्टर क्षेत्रात सिंचन केले जाते. या प्रकल्पामुळेच मानोरा-कारंजा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या नदीपात्रा उन्हाळा अखेरपर्यंत पाणी कायम राहते. त्यामुळे या नदीच्या पात्रात गाळपेर क्षेत्रावर अनेक शेतकरी, टरबूज, खरबूज, काकडीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. त्यापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पादनही होते, तसेच हरभरा आणि गहू पिकाचीही पेरणी या पात्रात केली जाते.
यंदा हरभरा गहू पिकाची काढणी झाल्यानंतर शेतकºयांनी गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी या नदीपात्रात टरबूज, खरबूजासह काकडीची लागवड केली आहे. या नदीपात्रातील ओलाव्यासह उथळ पाण्याचा उपसा करून ही पिके वाढविली जातात; परंतु आता उन्हाळा अर्ध्यावरच असताना या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे लागवड होऊन फुटभर उगवलेले पिकांचे वेल माना टाकू लागले आहेत. त्यामुळे आता उत्पादनाची आशा राहिली नसून, शेतकºयांनी या पिकांवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यातच गेल्याचे स्पष्ट होत आहे. नदीच्या पात्रातून ठिकठिकाणाहून होणारा वारेमाप, उपसा आणि रखरखत्या उन्हामुळे या नदीचे पात्र कोरडे पडले आहे.