शिक्षकाच्या खून प्रकरणातील आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ; गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:07 IST2018-03-01T19:07:27+5:302018-03-01T19:07:27+5:30
मानोरा : आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले.

शिक्षकाच्या खून प्रकरणातील आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ; गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त
मानोरा : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या एका शेतशिवारात उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले.
पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याने त्याचा सहकारी शिक्षक इमरान अनु नौरंगाबादी याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला उघडकीस आली होती. या प्रकरणाची कबूली देऊन आरोपीने स्वत: मृतदेह कुठे पुरला, याची माहिती मानोरा पोलिसाला दिली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आणि शवविच्छेदनानंतर २८ फेब्रुवारीलाच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दरम्यान, १ मार्चला आरोपीला विद्यमान न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान तपास अधिकारी धर्माजी डाखोरे यांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले एमएम ३७ जी ८७४४ क्रमांकाचे वाहन जप्त केले. चौकशीदरम्यान हा खून कसा झाला, या प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश होता काय या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.