दुचाकीवरून पडलेली महिला एसटीखाली चिरडून ठार
By सुनील काकडे | Updated: May 30, 2024 18:29 IST2024-05-30T18:29:12+5:302024-05-30T18:29:18+5:30
ढोणी गावानजिकची घटना : पोलिसांत तक्रार

दुचाकीवरून पडलेली महिला एसटीखाली चिरडून ठार
वाशिम : रोहणा (ता.मानोरा) येथून पारवा (ता.पुसद, जि.यवतमाळ) येथे दुचाकीवरून जात असलेली महिला प्रवासादरम्यान गाडीवरून पडली. त्यात तिला फारशी दुखापत झाली नव्हती. मात्र, याचदरम्यान आलेल्या एसटीच्या चाकाखाली चिरडल्या जावून तिचा मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना ३० मे रोजी मंगरूळपीर तालुक्यातील ढोणी गावानजिक घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक महिलेच्या मुलाने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तो त्याची आई मंदा गणेश गोडे (५०) हे एम.एच. २९ बी.एक्स. ९२४५ क्रमांकाच्या दुचाकीने पुसद येथील पारवा गावात दशक्रियेच्या कार्यक्रमास चालले होते. ढोणी गावाजवळ अचानक आई दुचाकीवरून खाली पडली.
याचवेळी तेथून जात असलेल्या मंगरूळपीर आगाराच्या एम.एच. ४० एन ९१२९ या क्रमांकाच्या एसटीचे पुढचे चाक अंगावरून गेल्याने चिरडल्या जावून मंदा गोडे यांचा जागीच मृत्यू झाला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली. पुढील तपास आसेगाव पोलिस करित आहे.