शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना
By सुनील काकडे | Updated: March 15, 2024 16:56 IST2024-03-15T16:55:26+5:302024-03-15T16:56:12+5:30
गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि...

शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना
वाशिम : कारंजा तालुक्यातील किन्ही रोकडे शेतशिवारात १४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून पाच एकरातील गहू भस्मसात झाला. त्यात संबंधित शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना शाॅर्ट शर्किटमुळे घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, किन्ही रोकडे शेतशवारात सर्वे नंबर ५८/१ मध्ये शेखर नामदेव येवतकर व अक्षय नामदेव येवतकर या दोघा भावंडांची शेती आहे. त्यात त्यांनी पाच एकरावर यंदा गव्हाची पेरणी केली होती. गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि त्याची ठिणगी गव्हात पडल्याने गहू पेटला.
पाच एकरातून येवतकर बंधूंना सुमारे १२५ क्विंटल गहू उत्पन्नाची अपेक्षा होती. परंतु संपूर्ण गहू आगीत भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले. तलाठी चिकटे यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला. तसेच नुकसान भरपाईसाठी शेखर येवतकर व अक्षय येवतकर यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली आहे.
किन्ही रोकडे शिवारात आग लागून पाच एकरातील गहू जळाला. ही घटना महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाल्याने घडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तशी माहिती वरिष्ठांना कळविली असून घटनेचा तपास होवून तसा अहवाल सादर केला जाईल, असं धर्मेंद्र राजपूत, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कारंजा म्हणाले.