सरपंच पदासाठी ८ तर सदस्यासाठी ३ अर्ज!
By संतोष वानखडे | Updated: November 28, 2022 19:02 IST2022-11-28T19:01:38+5:302022-11-28T19:02:27+5:30
२८७ ग्रामपंचायतींची निवडणूक, अर्जासाठी २ डिसेंबरची मुदत

सरपंच पदासाठी ८ तर सदस्यासाठी ३ अर्ज!
वाशिम (संतोष वानखडे): ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरपंच पदसाठी ८ तर सदस्य पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पहिल्या टप्पात जिल्ह्यातील एकमेव केकतउमरा ग्रामपंचातची निवडणूक पार पडली होती. दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा समावेश असून, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज घेऊन ते दाखल करता येणार आहेत.
सोमवारपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात झाली असून, मंगरूळपीर तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही. वाशिम तालुक्यातून सदस्य पदासाठी एक तर सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात गुलाबी थंडीत राजकारण पेटले असून, ग्रामपंचायतवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
तालुकानिहाय प्राप्त अर्ज-
तालुका -सदस्य -सरपंच
वाशिम - १ - २
मालेगाव - ० - २
रिसोड - ० - २
मं.पीर - ० - ०
कारंजा - २ - १
मानोरा - ० - १