वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:03 PM2020-02-01T15:03:13+5:302020-02-01T15:03:26+5:30

गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

62 girls missing during the year; Parental concern increased | वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

googlenewsNext

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली असून, चालु महिन्यातही ४ मुली बेपत्ता झाल्या. यामधील एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत १५ दिवसांत वाशिम जिल्ह्यात जवळपास चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनेच्या अनुषंगाने गत वर्षभरातील आढावा घेतला असता जवळपास ६२ मुली बेपत्ता झाल्या असून, यापैकी ४४ मुलींचा शोध लागला आहे. उर्वरीत १८ मुलींचा शोध अद्याप लागला नाही. या मुलींच्या बेपत्ता होण्यामागील निश्चित कारणे अद्याप समोर आली नाहीत. पिडीत मुलींचे अपहरण झाले की कुणी फूस लावून पळवून नेले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
विविध कारणांमुळे मुली, महिला बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गत वर्षातही मुली, महिला बेपत्ता होण्याची प्रकरणे घडली होती. सन २०२० च्या सुरूवातीलाच मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या. चार मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध अद्याप लागला नाही. एका बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अजून दोन मुली बेपत्ता झाल्याचे संदेश सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. परंतू, या घटनेची पोलीस दप्तरी कुठेलीही नोंद नाही. बेपत्ता मुलींचा शोध लावण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दोन बेपत्ता मुलींचा शोध लवकरच लागेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पालकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे ठरत आहे.

सोशल मीडीयापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे
अल्पवयीन मुला-मुलींमध्ये सध्या फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचे फॅड आहे. संवाद साधण्याचे सोपे व सहज माध्यम म्हणून फेसबुक, मेसेंजरचा सर्रास वापर होत आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मुलींची फसगत झाल्याचे प्रकारही वाशिमसह नजीकच्या अकोला, बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. या प्रकारापासून सावध होत मुला-मुलींनी सोशल मीडियाच्या वापरावर स्वत:हून नियंत्रण आणले तर संभाव्य फसगतीला आपसूकच आळा बसू शकेल, यात शंका नाही.
सन २०२० मध्ये जानेवारी महिन्यात तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. एका मुलीचे लोकेशन मिळत नाही. दोन मुलींचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या तपासाला योग्य दिशा मिळत आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पालकांनीदेखील आपल्या पाल्यासंदर्भात सतर्क राहिले पाहिजे. अल्पवयीन मुला-मुलींना शक्यतोवर अँड्राईड मोबाईल देणे टाळले पाहिजे. आपल्या पाल्याचे कोण मित्र आहेत यावरही पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. आपले पाल्य कुणाशी भेटताहेत यावरही लक्ष असायला हवे. पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, वेळोवेळी चेक करावे, शाळेला भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले.

Web Title: 62 girls missing during the year; Parental concern increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.