पाटणींचा ५०० कोटींचा जमीन घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:57+5:302021-08-21T04:46:57+5:30
खासदार गवळी म्हणाल्या की, वाशिम शहरातील रिसोड मार्गावर असलेले व्यावसायिक दुकानांचे गाळे अवैधरित्या बांधलेले आहेत. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक ...

पाटणींचा ५०० कोटींचा जमीन घोटाळा
खासदार गवळी म्हणाल्या की, वाशिम शहरातील रिसोड मार्गावर असलेले व्यावसायिक दुकानांचे गाळे अवैधरित्या बांधलेले आहेत. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. या गाळ्यांमध्ये २०१४ ते २०१७ पर्यंत अधिकृत विजेचे कनेक्शन नसताना वीज कशी वापरली गेली, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या जागेवर फ्लॅट (निवासी) चे बांधकाम करण्याची परवानगी मागितली, त्या जागेवर व्यावसायिक दुकानांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय वाशिम शहरातील शेत स. नं. ५०२ ही पुसद नाकालगतची जमीन अकृषक करण्यासाठी एकत्रित खरेदी दाखविली गेली. तथापि, ही खरेदी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे. २००९-१० मध्ये जमिनीचे चुकीचे फेरफार तयार करण्यासाठी महसूल विभागाला भाग पाडले. वाशिम येथील एका तलाठ्याला हाताशी धरून चुकीचे दोन फेरफार तयार करावयास लावले. त्यामध्ये फेरफार क्र. ४४१९ व फेरफार ४४२० या दोन्ही फेरफारचे आधार किंवा फेरफारचा व्यवहार हा वाटणीपत्र असे चुकीचे दाखविण्यात आल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला. अशाप्रकारे शहर इतर ठिकाणच्या जमिनी बळकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून सुमारे ५०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप खासदार गवळी यांनी केला आहे.
या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय आणी ईडीलासुध्दा पत्र देणार असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.