४.८३ लाख क्विंटल तूर मोजणीविना!
By Admin | Updated: June 1, 2017 01:57 IST2017-06-01T01:57:25+5:302017-06-01T01:57:25+5:30
नाफेड तूर खरेदी प्रकरण : टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी यापुढेही सुरू राहणार!

४.८३ लाख क्विंटल तूर मोजणीविना!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील नाफेड केंद्रांवर ४ लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. ३० मे पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर यापुढेही खरेदी केली जाणार असल्याच्या सूचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी बाजार समितीला बुधवारी दिल्या, अशी माहिती बाजार समितीच्या सचिवांनी ‘लोकमत’ला दिली.
यावर्षी तूरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले. मात्र, हमीभावानुसार तुरीची खरेदी होण्याची कोणतीही हमी नसल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. नाफेड केंद्रावर तुरीला हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी आणली. मध्यंतरी शासनाने नाफेड केंद्रांवरील तुरीची खरेदी बंद केली होती. शासनाने ११ मेपासून ते ३१ मेपर्यंत नाफेड केंद्रांवर तुरीची खरेदी करण्याची घोषणा केली होती. वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे बाजार समिती परिसरात नाफेड केंद्रांवर सुरुवातीला शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. मात्र, नाफेड केंद्रांवर आवश्यक त्या वजनकाट्यांचा व मनुष्यबळाचा अभाव, यामुळे अंतिम मुदतीपर्यंत अर्थात ३१ मे पर्यंत टोकन मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी होऊ शकली नाही. जिल्ह्यातील पाचही नाफेड केंद्रांवर टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची एकूण ४ लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणी अद्याप शिल्लक आहे. अंतिम मुदतीपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत संभ्रमावस्था होती. दुपारनंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी बाजार समित्यांना सूचना दिल्यानुसार, ३० मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी यापुढेही केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी स्पष्ट केले.
वाशिम येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाफेडने तूर खरेदी केली. वाशिम येथे १५ मे ते ३० मे पर्यंत ६६८३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. १५ मे ते ३१ मे पर्यंत ५९३ शेतकऱ्यांची १२ हजार क्विंटल तूर मोजण्यात आली. ६०९० शेतकऱ्यांची जवळपास १ लाख ४० हजार क्विंटल तूर खरेदी करणे शिल्लक आहे, असे बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे यांनी सांगितले.
रिसोड येथे नाफेड केंद्रावर तुरीची एकूण आवक १ लाख २३ हजार ५० क्विंटल अशी आहे. १७ मे पासून ३० मे पर्यंत १८० शेतकऱ्यांची ३३८४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ३१ मे रोजी २० शेतकऱ्यांची ५०० क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची एकूण १ लाख १९ हजार ६६० क्विंटल तूर खरेदी करणे शिल्लक आहे.
कारंजा येथील नाफेड केंद्रावर ३० मे पर्यंत ३३३९ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. ३१ मे पर्यंत कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची ६३ हजार ९२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. टोकन मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांची एकूण ८० हजार क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे.
मंगरूळपीर येथे ३९३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार ६४५ क्विंटल तूर मोजणी झाली आहे. अद्याप ६५ हजार क्विंटल तूर मोजणी शिल्लक आहे. मालेगाव येथे ३७२० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. ८० हजार क्विंटल तूर आली. त्यापैकी १००७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. उर्वरित ७८ हजार ९९३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. मुदतीच्या आत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर यापुढेही खरेदी केली जाणार आहे, असे बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांनी सांगितले.
कृषी राज्यमंत्र्यांचे बाजार समितीला पत्र प्राप्त
३१ मे रोजी नाफेडची तूर खरेदीची अंतिम मुदत असल्याच्या पृष्ठभूमीवर ३१ मे रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाते यांनी बाजार समित्यांना पत्र पाठवून टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, वजनकाट्याची संख्या वाढवावी, तसेच पावसाचे दिवस लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे कळविले आहे.