विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास ४१ टक्के पालकांचा होकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:31+5:302021-02-05T09:29:31+5:30
सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले ...

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास ४१ टक्के पालकांचा होकार !
सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत ३,९०१ शिक्षक आणि १,३२८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आतापर्यंत ३,३४१ शिक्षक आणि ९८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली असून, यापैकी ५० शिक्षक आणि १ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ५१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे. याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक हे पालकांशी संवाद साधत असल्याचे दिसून येते. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, तीन दिवसांतच ४१ टक्के अर्थात ३३ हजार ४२२ पालकांनी संमतीपत्र दिले आहे.
०००
एकूण शाळा ८०६
शाळा सुरू ७८४
एकूण विद्यार्थी ८१,५१८
उपस्थित विद्यार्थी ३४,४२२
एकूण शिक्षक ३,९०१
कोरोना चाचणी ३,३४१
पॉझिटिव्ह ५०
एकूण शिक्षकेतर कर्मचारी १,३२८
कोरोना चाचणी ९८७
पॉझिटिव्ह १
००००००००००००
शाळांमध्ये कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जात असून, पालकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती कमी करण्याचे प्रयत्न शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षकांतर्फे केले जात आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम
०००
शाळेमध्ये कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालकांशी संवाद साधून अधिकाधिक संमतीपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळेत प्रवेश दिला जात असून, एका बेन्चवर एक विद्यार्थी बसविण्यात येत आहे.
- हेमंत तायडे
मुख्याध्यापक, जि. प. शाळा, जांभरूण नावजी