३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणीच नाही!

By Admin | Updated: January 20, 2016 01:59 IST2016-01-20T01:59:34+5:302016-01-20T01:59:34+5:30

मालेगाव तालुक्यातील शेतक-यांची दयनीय अवस्था, जमिनीत ओलावा नसल्यापे पेरणी रखडली.

35 percent of the land is not sown rabi! | ३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणीच नाही!

३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणीच नाही!

मालेगाव : पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याचे परिणाम शेतकर्‍यांना रब्बी हंगामात भोगावे लागत आहेत. अल्प पाऊस आणि परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने मालेगाव तालुक्यातील ३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. एकूण ११ हजार ६५0 पैकी ७ हजार ६७८ हेक्टरवर पेरणी झाली. २0१५ च्या पावसाळ्यात सुरुवातीला जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला; मात्र मालेगाव तालुक्यातील शिरपूर, झोडगा, राजुरा परिसराचा अपवाद वगळता, उर्वरित भागात अल्प पाऊस झाला. त्यानंतरही पावसात नियमितता नव्हती. ऐन शेंगा भरण्याच्या वेळी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. खरीप हंगामातील कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांनी मशागत केली; मात्र, परतीच्या पावसाने दगा दिला. परिणामी, बर्‍याच कोरडवाहू शेतकर्‍यांना रबीची पेरणी करता आली नाही. मालेगाव तालुक्यात एकूण पेरणी ६५ टक्के झाली असून, ३५ टक्के क्षेत्र नापेर राहिले. जमिनीत ओलावा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. गव्हाचे सरासरी क्षेत्र ४२४0 हेक्टर असून, १४७६ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १00 हेक्टर अपेक्षित असताना १५८ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी मका पिकाची पेरणी होण्याचे अपेक्षित नसताना ७२ हेक्टरवर पेरणी झाली. हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र ७ हजार २0 हेक्टर असून, ५ हजार ९६५ हेक्टरवर पेरणी झाली. करडईचे सरासरी क्षेत्र २७0 हेक्टर असून, कुठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. एकूण सरासरी ११ हजार ६५0 हेक्टर क्षेत्र असून, ७ हजार ६७८ हेक्टरवर पेरणी झाल्याने उर्वरित ३५ टक्के जमिनीवर पेरणी होऊ शकली नाही. जमिनीत ओलावा नसल्याने ३५ टक्के क्षेत्र नापेर राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसानच झाले आहे.

Web Title: 35 percent of the land is not sown rabi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.