२५ दिवसात २९ विषारी सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:51+5:302021-06-26T04:27:51+5:30

पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ ...

29 poisonous snakes saved in 25 days | २५ दिवसात २९ विषारी सापांना जीवदान

२५ दिवसात २९ विषारी सापांना जीवदान

पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याच बरोबर सापांच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून - ऑगस्ट या कालावधित मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. भारतात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी वाशिम जिल्ह्यात केवळ चारच जातीचे विषारी साप आढळतात. ते म्हणजे नाग, मन्यार, घोणस व फुरसे हे आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने सापांचा मानवी वस्तीत संचार वाढला आहे. मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मंगरुळपी व मानोरा तालुक्यात विविध ठिकाणी १ जून ते २५ जून या कालावधित आढळलेल्या ७० सापांना पकडून जीवदान दिले. त्यात २९ विषारी सापांचा समावेश होता.

------------

सर्वाधिक संख्या नागांची

निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी २५ दिवसात पकडलेल्या २९ विषारी सापांमध्ये सर्वाधिक संख्या नागांची होती. त्यांनी २० नाग, ८ मन्यार, तर एका घोणस जातीच्या सापाला पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. एक निम विषारी साप ही त्यांनी पकडला. शिवाय कवड्या, धामण, गवत्या, तस्कर, पानदिवड आदी बिनविषारी साप त्यांनी पकडत सुरक्षितपणे जंगलात सोडले.

----------------

घरापासून सापांना दूर ठेवण्यासाठी हे करावे !

सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी घराच्या भिंती नजिकची बिळे बुजवावित, पालापाचोळा काढून परिसर साफ करावा, लाकडाची ढीग, दगड विटांचे ढीग हटवावेत, सरपण गोवऱ्या घरालगत न ठेवता दूर उंच जागेवर ठेवाव्यात, दरवाजे, खिडक्यांच्या नजिक असलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर पडताना बॅटरी घेऊनच पडावे, गवतात चालताना बूट घालावेत.

Web Title: 29 poisonous snakes saved in 25 days