वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ डिसेंबरला मतदान
By संतोष वानखडे | Updated: November 9, 2022 18:10 IST2022-11-09T18:10:44+5:302022-11-09T18:10:58+5:30
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला.

वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ डिसेंबरला मतदान
वाशिम : ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतींमध्ये राजकीय धुराळा उडणार आहे.
पहिल्या टप्पात जिल्ह्यातील एकमेव केकतउमरा ग्रामपंचातची निवडणूक पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी जाहिर केला.
यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करणे, ५ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप केले जाईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता मतदान पार पडेल. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता गुलाबी थंडीत गावकीचे राजकारण पेटणार आहे.