वाशिम जिल्ह्यातील २७८ कलावंतांचे मानधन आठ महिन्यांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:03 PM2017-10-15T14:03:07+5:302017-10-15T14:04:39+5:30
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल २७८ कलांवतांचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल २७८ कलांवतांचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. या कलावतांच्या समस्येची जाण ठेवत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १३ आॅक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालकांना निवेदन पाठवून कलावंताचे मानध दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी केली आहे.
अंगी असलेल्या अभिजात कलागुणांचा प्रभावी वापर करून लोककलेच्या माध्यमातून विविध समस्यांबाबत जनजागृती करून शासनाच्या कार्यात हातभार लावतानाच जनतेच्या चेहºयावर हास्य पसरविणारे वृद्ध कलावंत स्वत: मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे हतबल झाले आहेत. या कलांवंतांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कारंजा शाखेचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत भाके व इतर कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. वयोवृध्द साहित्यिक कलावंतांंचे मानधन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता मानधन थेट कलावंतांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी वर्ग-१ यांनी जिल्ह्यातील कलावंतांचे खाते क्रमांक संकलित करून ते संबंधित यंत्रणेकडेही पाठविले आहेत; परंतु या कार्यवाहीला बराच कालावधी उलटला तरी, कलावंतांच्या खात्यात मानधनाची दमडीही पडली नाही. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कारंजाच्यावतीने पुन्हस १३ आॅक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालकांकडे निवेदन पाठवून वृद्ध कलावंतांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात साडे चारशेपेक्षा अधिक कलांवत असून, त्यामधील तब्बल २७८ कलावंतांचे मानधन आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. यातील निम्मे कलावंत आयुष्याच्या अखेरच्या वळणावर असून, त्यामधील बहुतेकांना अर्थाजनाचा दुसरा पर्यायसुद्धा उरलेला नाही. आयुष्यभर सामाजिक समस्या दूर करण्यासाठी जनजागृृती केली, लोकांना कलेच्या माध्यमातून जीवनाचा सन्मार्ग दाखविला, आता त्यांच्या समस्या मात्र दुर्लक्षीत असल्याने हे कलावंत हताश झाले आहेत.