साखरा जिल्हा परिषद शाळेला २.५० कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:53+5:302021-06-05T04:28:53+5:30
उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा असल्यामुळे दिवसेंदिवस साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिकविण्याकडे पालकांचा वाढता कल आहे. शैक्षणिक प्रवेशाकरिता आजवर ...

साखरा जिल्हा परिषद शाळेला २.५० कोटींचा निधी मंजूर
उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा असल्यामुळे दिवसेंदिवस साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिकविण्याकडे पालकांचा वाढता कल आहे. शैक्षणिक प्रवेशाकरिता आजवर कधी नव्हे असा अभूतपूर्व प्रतिसाद पालकांकडून मिळत आहे. अशातच जुन्या इमारतीमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे तसेच या शाळेमध्ये बालवाडी ते इयत्ता आठवीपर्यंतचीच मान्यता असल्याने वर्ग नववी ते बारावीच्या मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मान्यता कधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दिवसेंदिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त करणाऱ्या या शाळेच्या विविध विकासकामांसाठी सुरुवातीला लोकवर्गणीतून आणि त्यानंतर शासनाच्या विविध विभागामार्फत वेगवेगळ्या फंडातून आजवर निधी मिळाला आहे. त्यातून शाळेचा विकास घडवून आणण्यात आला. वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यांनी साखरावासीयांचे व शाळेच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या या शाळेच्या नवीन इमारतीसाठी त्यांच्या कार्यकाळात ३६ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. लवकरच साखरा येथील या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार असून, हा निधी मिळाल्यामुळे साखरावासी व शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे.
.................
निधीची कमतरता भासू देणार नाही : खासदार गवळी
विकासकामासाठी आपण नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. साखरा येथील जिल्हा परिषद शाळा ही शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याचे नावलौकिक करणारी शाळा आहे. या शाळेच्या विकासासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला असून, यापुढेही शाळेच्या विकासाकरिता व विद्यार्थी हिताकरिता सदैव प्रयत्नरत राहून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली.