मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना एक कोटींचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:43+5:302021-05-16T04:39:43+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना ...

मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना एक कोटींचा दंड !
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना गत तीन महिन्यांत पोलीस प्रशासनाने एक कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रोख १४ लाख ३५ हजार ५०० रुपये तर ई-चालानद्वारे ८५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने वारंवार केले. परंतु, याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्याने पोलीस विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १५ फेब्रुवारी ते १३ मे या कालावधीत १९ हजार ९९६ जणांनी मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आल्याने ९९ लाख ९८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
०००००
बॉक्स
६६४० जणांचा ट्रिपल सीट प्रवास!
कोरोना काळात ट्रिपल सीट प्रवास सुसाट असल्याने याविरुद्धदेखील पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गत तीन महिन्यांत ६६४० वाहनचालक हे ट्रिपल सीट वाहन चालवित असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून १३ लाख २८ हजाराचा दंड वसूल केला. यामध्ये रोख १.३७ लाख रुपये तर ई-चालानद्वारे ११ लाख ९१ हजारांचा समावेश आहे.
००००
अशी आहे दंडात्मक कारवाईची रक्कम
विनामास्क - १९९९६
दंड : ९९.९८ लाख
ट्रिपल सीट : ६६४०
दंड : १३.२८ लाख