बेशिस्त वाहनधारकांना १४ लाखांचा दंड
By Admin | Updated: December 29, 2014 00:34 IST2014-12-29T00:34:30+5:302014-12-29T00:34:30+5:30
वाशिम शहर वाहतूक शाखेची १५000 वाहनांवर कारवाई, लाखो रुपयांचा महसूल वसूल.

बेशिस्त वाहनधारकांना १४ लाखांचा दंड
वाशिम : वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा निर्माण करणार्या जवळपास १५ हजार वाहनांवर वाशिम शहर वाहतुक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे. कारवाईपोटी आकारलेल्या दंडातून शासनाच्या तिजोरीत १४ लाख रुपयांचा महसुल शहर वाहतुक शाखेने जमा केला आहे. वाशिम शहरातील वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रकार सर्वश्रूत आहेत. बेशिस्त वाहतुकीला वठणीवर आणण्याचा प्रयत्न वाहतुक शाखांकडून होत असला, तरीदेखील वाहतुक काही प्रमाणात बेशिस्तच राहते. वाहनधारकांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळल्यास, बेशिस्त वाहतुक बर्यापैकी आटोक्यात येऊ शकते. नियमांना चिरडणार्या वाहनधारकाविरूद्ध शहर वाहतुक शाखेने जानेवारी ते २७ डिसेंबर २0१४ दरम्यान कारवाई मोहिम राबविली. एकूण १५ हजार वाहनांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आल्याने वाहतुक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. दंडापोटी एकूण १४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. अवैध प्रवासी वाहतुक, तिबल सिट, रहदारीस अडथळा, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून सदर कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी वाहतुक शाखेचा कारवाईचा आकडा कमी होता. गत वर्षी अंदाजे सात हजार ५00 वाहनधारकांकडून १0 लाखाचा महसूल दंडापोटी वसुल करण्यात आला होता. फॅन्सी क्रमांकातून अक्षरे तयार करण्याचे फॅड आहे. मात्र, सदर फॅड कधी कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. एखादा अपघात झाला अथवा वाहनाची चोरी झाली तर अशा वेळी फॅन्सी नंबरप्लेटवरून नेमका तो नंबर कोणता आहे हे ओळखणे कठीण जाते. त्यातून पोलिसांच्या तपासातही अडथळे निर्माण होतात. यामुळे फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणार्या वाहनांवर कारवाई केली जाते. सदर कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्याचा मनोदय वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी व्यक्त केला.