१३९ शिक्षकांची मान्यता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:41 IST2019-09-21T15:41:50+5:302019-09-21T15:41:57+5:30
शिक्षण सेवेत भरती झालेल्या १३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पद मान्यता धोक्यात सापडली आहे.

१३९ शिक्षकांची मान्यता धोक्यात
- माणिक डेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही.जी. लबडे यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमिततेतून शिक्षण सेवेत भरती झालेल्या १३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पद मान्यता धोक्यात सापडली आहे. याप्रकरणी संबंधितांची २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून त्यात नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव, शिक्षक, शिक्षण सेवक व कर्मचाºयांना नोटीस पाठवून २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान आवश्यक सर्व कागदपत्र, पुरावे, रेकॉर्ड, लेखी म्हणणे यासह शिक्षण मंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास एकतर्फी कामकाज पूर्ण करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालिन शिक्षणाधिकारी लबडे यांच्या कार्यकाळात पद भरतीत अनियमितता होऊन रुजू झालेल्या काही शिक्षक कर्मचाºयांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.