बारावीची परीक्षा रद्द; पण शुल्क परतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST2021-06-06T04:30:09+5:302021-06-06T04:30:09+5:30

संतोष वानखडे वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. परीक्षा रद्द ...

12th standard examination canceled; But what about fee refunds? | बारावीची परीक्षा रद्द; पण शुल्क परतीचे काय?

बारावीची परीक्षा रद्द; पण शुल्क परतीचे काय?

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील १८,१७५ विद्यार्थ्यांना ८१.७८ लाख रुपये परीक्षा शुल्क परत कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची परीक्षा यापूर्वीच रद्द केली. आता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ असून, यापैकी १८० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १८ हजार १७५ विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेत होते. बारावी परीक्षेचे शुल्क ४५० रुपये असून, १८१७५ विद्यार्थ्यांनी एकूण ८१ लाख ७८ हजार ७५० रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, शुल्क परत केव्हा मिळणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

००

अशी आहे जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील एकूण कनिष्ठ महाविद्यालये -१८०

दहावीतील एकूण विद्याथी : १८,१७५

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४५०

एकूण परीक्षा शुल्काची रक्कम - ८१.८१ लाख

०००००

कोट

बारावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. जिल्ह्यात १८ हजार १७५ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- रमेश तांगडे,

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम

...................

कोट

कोरोनामुळे बारावीच्या शाळा जवळपास १ महिनाभर सुरू होत्या. त्यानंतर शाळाही बंद होत्या. ऑनलाइन पद्धतीने शिकवणी झाली. बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.

- सुहास खोब्रागडे, विद्यार्थी

Web Title: 12th standard examination canceled; But what about fee refunds?