जिल्ह्यातील ११६ बसेस कोराेना फ्री; प्रवाशांनी मात्र दक्षता घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:11+5:302021-09-14T04:48:11+5:30
वाशिम : कोरोनाच्या भीतीने प्रवासी एसटी बसेसचा वापर करणे टाळत असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसवर अँटी मायक्रोबियल कोटींगचा निर्णय ...

जिल्ह्यातील ११६ बसेस कोराेना फ्री; प्रवाशांनी मात्र दक्षता घेणे आवश्यक
वाशिम : कोरोनाच्या भीतीने प्रवासी एसटी बसेसचा वापर करणे टाळत असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसवर अँटी मायक्रोबियल कोटींगचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील ११६ एसटी बसेसला अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्यात आल्याने त्या कोराेना फ्री झाल्यात. तथापि, या बसमध्येही प्रवाशांना बाधित व्यक्तीपासून स्वत:च्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) त्यांच्या दहा हजार बसेसवर अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत सर्वांना भीती असताना, एसटी महामंडळाने हा नवा प्रयोग केला आहे. ज्यात प्रवाशांना कोरोनापासून सुरक्षा मिळू शकते. राज्यातील सर्व एसटी बसेसना आतून बाहेरून अँटी मायक्रोबियल कोटिंग करायला सुरुवात झाली आहे. यात जिल्ह्यातील एकूण १४१ बसेसपैकी ११६ बसेसचे अँटी मायक्रोबियल कोटिंग झाले आहे. असे असले तरी प्रवाशांना बाधित व्यक्तीपासून स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क वापरण्यासह इतर दक्षता घ्यावीच लागणार आहे.
०००००००००००००००००००००००००००००
कोटिंगचा प्रभाव दोन महिने
एसटीला अँटी मायक्रोबियल कोटिंग केल्यानंतर जवळपास २ महिने प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक २ महिन्याला कोटिंगचा खर्च ९५०० हजार रुपये आहे, तर एका एसटीला वर्षातून ४ वेळा कोटिंग केले जाईल. यापूर्वी थेट विमान कंपन्या या तंत्राचा उपयोग करत होत्या.
०००००००००००००००००००००००००००००
एसटीच्या अँटी मायक्रोबियल कोटिंगचा फायदा
अँटी मायक्रोबियल कोटिंग अंतर्गत पृष्ठभागावर केमिकल एजेंट्स लावले जात आहे. यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस पसरत नाही. अर्थात कोरोनाबाधितामुळे एसटीच्या कोणत्याही भागावर कोरोना विषाणू पसरला तरी तो जिवंत राहू शकणार नसून, क्षणातच नष्ट होणार आहे.
०००००००००००००००००००००००००००००